संभाजी भिडे यांनी कोरोनाबद्दल केलेली विधानं कितपत खरी आहेत? - फॅक्ट चेक

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (21:04 IST)
जे कोरोनामुळे मरत आहेत, ते जगायच्या लायकीचे नव्हते, असं विधान शिवप्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. "कोरोना हा रोगच नाही, तो (अपशब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे," असं म्हणत त्यांनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांवरून सरकारवर टीका केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे, जे स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत, चेहऱ्यावर मास्क घालून नव्हते. त्यांच्या अवतीभवती बराच फौजफाटा होता, मात्र ते सगळे मास्क घालून होता.
 
मात्र कोरोनाच्या अस्तित्वाला नाकारताना भिडेंनी काही अशी वक्तव्यं केली आहेत, जी वादग्रस्त आणि दिशाभूल करणारी आहेत. त्यामुळे त्यांची सत्यताही आम्ही इथे तुमच्यापुढे मांडत आहोत.
 
संभाजी भिडे काय म्हणाले?
दावा : "कोरोना हा रोगच नाहीय अस्तित्वात. अस्तित्वात नसलेलं काळं मांजर काळ्याकुट्ट अंधारात शोधण्यासारखंच कोरोना हा रोग आहे."
 
फॅक्ट चेक : वुहानमधल्या एका जंगली मांसाच्या बाजारातून या कोरोना व्हायरसचा उगम झाल्याचं सांगितलं जातं. कुण्या एका व्यक्तीने इथल्या एका प्राण्याचं मांस खालल्याने तो विषाणू मानवी शरीरात आला, आणि मग तिथून तो नाका-तोंडावाटे लोकांमध्ये पसरू लागला.
 
या कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या रोगाला नंतर कोव्हिड-19 (Corona Virus Disease-19) असं नाव देण्यात आलं. जगभरात आतापर्यंत कोट्यावधी लोकांना हा रोग झाला आहे, आणि लाखोंचा बळीसुद्धा गेला आहे.
 
त्यापासूनच बचावासाठी शास्त्रज्ञांनी कोरोनावरच्या विविध लशी वर्षभराच्या आत विक्रमी वेळेत विकसित केल्या. आणि भारतासह अनेक देशांमध्ये सध्या युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
 
दावा : "जे जगायचे, ते जगतील. जे मरायचे, ते मरतील. जे मरत आहेत, ते जगायच्या लायकीचे नव्हते."
 
फॅक्ट चेक : कोरोना व्हायरस तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला कसं कमकुवत करतो, तुमचं शरीर कसं पोखरतो, हे आता वेगळ्याने सांगायला नको. पण त्याविषयी तुम्ही इथे वाचू शकता.
 
जे कोरोनातून बरे झाले, त्यांच्या रोगाचं निदान योग्य वेळेत झालं किंवा त्यांना योग्य वेळेत उपचार मिळालेत.
 
जगभरात आत्तापर्यंत 28 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतात हा आकडा सुमारे 1 लाख 67 हजारांच्या घरात आहे. हे सगळे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं निदान आजवर डॉक्टरांनी केलं आहे.
 
दावा : "मास्क लावा मास्क लावा. कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर हा मास्क लावण्याचा हा सिद्धांत काढलाय? की सत्य शोधलंय, की कोरोना हटवायचा असेल तर मास्क लावला पाहिजे. काही मास्कची आवश्यकता नाही."
 
फॅक्ट चेक : कोरोना रोखण्यासाठी तीन गोष्टी प्रामुख्याने करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातल्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी केलं आहे.
 
1. सोशल डिस्टन्सिंग अर्थात शारीरिक अंतर राखणे
 
2. मास्क वापरणे जेणेकरून नाक-तोंड झाकलं जाईल आणि विषाणूंचा प्रसार कमी होईल
 
3. सतत हात धुणे, जेणेकरून नाका-तोंडाला, डोळ्यांना हात लागला तर कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करू शकणार नाही.
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, यासाठीची माहिती वाचण्यासाठी - कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
 
सोशल डिस्टन्सिंगची सक्तीची अंमलबजावणी व्हावी, म्हणून अनेक देशांनी लॉकडाऊन वा संचारबंदीचे आदेश लागू केलेत. ते आता आपल्याकडे पुन्हा एकदा लागू होताना दिसत आहे.
 
दुसरीकडे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनेक राष्ट्रांनी सक्तीचे केले आहे. मास्क वापरल्याने काय होतं, तर एकप्रकारे विषाणूंना बाहेर निघायला ब्रेक लागतो. एकमेकांच्या जवळ उभ्या दोन व्यक्तींनी मास्क घातला, तर कोरोना तुमच्या शरीरात शिरण्याचा धोका 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
 
दावा : "सगळी प्रजा आपण बावळट बनवत चाललोय. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जिवाची काळजी आहे, तो घेईल. सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न करावा, आणि देश रक्षणाचं काम करावं. लोकांचं आरोग्य लोकांवर सोडून द्यावं."
 
फॅक्ट चेक : कोरोना व्हायरसची साथ आली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने पावलं उचलण्याच्या सूचना जगभरातल्या सरकारांना दिल्या होत्या. अनेक देशांच्या नेत्यांनी आधी त्याकडे लक्ष दिलं नाही. ना कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे सक्तीचे आदेश जारी केलेत ना तातडीने संचारबंदी किंवा लॉकडाऊनसारखी पावलं उचलली. त्यामुळे त्या त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊन त्याचा अक्राळविक्राळ रूप जगाने पाहिलं.
 
उदाहरणार्थ, अमेरिका आजही जगात सर्वांत भयंकररित्या कोरोनाग्रस्त देश आहे. दुसरीकडे, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झायर बोल्सनारोसुद्धा सुरुवातीला म्हणाले होते, की "हा तर फक्त एक फ्लू आहे." नंतर कोरोनाने त्यांनाही गाठलं. ते बरे झाले, पण देशात अजूनही या साथीमुळे हाहाःकार माजलाय. 24 तासांमध्ये तिथे 4000 पेक्षा जास्त लोकांचा बळी जातोय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती