जर्मनीत हेरगिरी करणारं भारतीय जोडपं गजाआड

शनिवार, 14 डिसेंबर 2019 (10:32 IST)
जर्मनीमधल्या कोर्टाने भारतीय जोडप्याला हेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे. भारतीय परराष्ट्र गुप्तचर सेवेसाठी आपण जर्मनीमध्ये राहणाऱ्या काश्मिरी आणि शीख समुदायावर हेरगिरी करत असल्याची कबुली या जोडप्याने दिली आहे.
 
मनमोहन एस आणि त्यांच्या पत्नी कंवलजीत के. असं या जोडप्याचं नाव आहे. या दोघांनाही माहिती पुरवण्यासाठी सात हजार युरो मिळाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
 
मनमोहन एस यांना 18 महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे तर त्यांच्या पत्नी कंवलजीत यांना मोठा दंड आकारण्यात आला आहे.
 
काश्मीरवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला संघर्ष सर्वश्रृत आहे.
 
तर 80च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी शीख समुदायानं मोठी चळवळ सुरू केली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून ही चळवळ मोडून काढली. मात्र, तरीही स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी शीख अतिरेकी पुन्हा डोकं वर काढतील, याची चिंता कायम आहे.
 
भारताची गुप्तचर यंत्रणा असलेल्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगने (RAW) 2015 साली 51 वर्षीय मनमोहन एस यांची जर्मनीतील काश्मिरी लोकांवर पाळत ठेवण्यासाठी नियुक्ती केल्याचं फ्रँकफर्टच्या कोर्टाने म्हटलं आहे.
 
निकालपत्रात कोर्टाने म्हटलं, "आरोपीने कोलोन आणि फ्रँकफर्ट इथल्या गुरुद्वारांच्या अंतर्गत बाबींची तसंच शीख समुदायाकडून करण्यात आलेल्या विरोध आंदोलनाची माहिती पुरवली."
 
जुलै 2017 पासून ते सातत्याने भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठका करायचे आणि माहितीच्या मोबदल्यात त्यांना दरमहा 200 युरो देण्यात येत होते.
 
त्यांच्या पत्नी कंवलजीत के यादेखील बैठकींना उपस्थित असायच्या, असं कोर्टाने म्हटलं आहे.
 
तुरुंगवासासोबतच मनमोहन एस यांना सेवाभावी संस्थेला 1500 युरो देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तर कंवलजीत के. यांना पतीला मदत केल्याच्या आरोपाखाली 180 दिवसांच्या वेतनाइतका दंड सुनावण्यात आला आहे.
 
कोर्टाच्या या निकालाला आठवड्याभराच्या आत वरच्या कोर्टात दाद मागितली जाऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती