डोनाल्ड ट्रंप यांनी रॉबर्ट मुलरना हटवण्याचा प्रयत्न केला होता, चौकशी रिपोर्ट

शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (12:16 IST)
2016 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियानं डोनाल्ड ट्रंप यांच्या टीमसोबत हातमिळवणी केली होती का?, या प्रकरणाच्या चौकशीचा रिपोर्ट गुरूवारी जारी करण्यात आला.
 
धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणाची चौशी करणारे वकील रॉबर्ट मुलर यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता.
 
448 पानांच्या या रिपोर्टमध्ये ट्रंप यांच्या टीमला क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यांनी रशियाशी हातमिळवणी केली नसल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीत अडथळे निर्माण करण्याच्या आरोपांवर या रिपोर्टमध्ये कुठलाही ठोस निष्कर्ष दिल्याचं दिसत नाही.
 
गुरूवारी व्हाईट हाऊसनं 448 पानांच्या रिपोर्टमधील काही प्रमुख भाग सार्वजनिक केला. ट्रंप यांच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या टीमनं हा रिपोर्ट म्हणजे आपला विजय असल्याचं म्हटलं आहे.
 
यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ट्वीटरवर एक फोटो टाकला आहे, आणि लिहिलंय की, "काही हातमिळवणी झाली नाही, काही अडचण नाही. खेळ संपला"
 
विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा रिपोर्ट तयार केला आहे.
 
रिपोर्ट जारी करताना अटर्नी जनल विलियम बार यांनी म्हटलं आहे की, "यामध्ये न्यायप्रक्रियेत अडथळे आणल्याचा जो आरोप होता त्यासंबंधी किमान 10 प्रकरणांची चौकशी करण्यात आली."
 
डेमोक्रॅट सदस्यांनी पूर्ण रिपोर्ट जारी करण्याची मागणी करत मुलर यांना काँग्रेससमोर हजर होण्याची मागणी केली आहे.
 
'अखेर विजय झाला'
रिपोर्टमध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नमूद करण्यात आल्यात. ज्यात, "चौकशीत बऱ्याच ठिकाणी ट्रंप यांच्या प्रचारातील अनेक व्यक्ती आणि रशिया सरकारशी त्यांचे असलेले संबंध यांना आधोरेखित करण्यात आलं आहे. मात्र तो अपराध आहे, असं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीएत."
 
ट्रंप यांच्या टीमनं या चौकशी समितीचा रिपोर्ट आणि त्यातून समोर आलेलं सत्य हे राष्ट्रपती ट्रंप यांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सुरूवातीपासून जे म्हणत होतो, तेच रिपोर्टमध्ये आल्याचं ट्रंप यांच्या टीमनं म्हटलंय.
 
17 महिन्यांची चौकशी, 500 साक्षीदार आणि त्यांचे जबाब, 500 सर्च वॉरंट, 14 लाख पानांची तपासणी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी दिलेल्या सहकार्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, यात कुठल्याही प्रकारचा अपराध किंवा बेकायदेशीर गोष्टी घडलेल्या नाही.
 
रिपोर्टमध्ये आणखी काय आहे?
रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे म्हटलंय की डोनाल्ड ट्रंप यांनी मुलर यांना हटवण्यासाठी जून 2017 मध्ये व्हाईट हाऊसचे माजी वकील डॉन मॅकगॉन यांच्याशी संपर्क केला होता.
 
त्यावर आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्याने आपण राजीनामा दिला होता, असं मॅकगॉन यांनी विशेष वकिलांना सांगितलं. आपण राष्ट्राध्यक्षांच्या आदेशांचं पालन करू इच्छित नव्हतो असंही मॅकगॉन यांनी सांगितलं. आणि पुन्हा जर ट्रंप यांचा फोन आला तर आपण काय बोललं पाहिजे हेसुद्धा त्यावेळी कळत नव्हतं असं मॅकगॉन म्हणाले.
 
रिपोर्टनुसार..
चौकशी समिती नेमण्याची घोषणा झाल्यानंतर ट्रंप यांनी एक अपशब्द वापरत म्हटलं होतं की, "ओह माय गॉड.. हे खूप वाईट आहे. ही माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाची शेवट आहे."
 
रॉबर्ट मुलर यांनी चौकशीत अडथळे आणण्याच्या 10 प्रयत्नांची चौकशी केली
 
चौकशी समितीनं ट्रंप यांची लेखी उत्तरं पुरेशी नसल्याचं म्हटलंय. मात्र एका मोठ्या कायदेशी प्रक्रियेपासून दूर राहण्यासाठी त्यांना समोरासमोर आणण्याचा पर्याय निवडला नसल्याचं स्पष्ट केलंय.
 
ट्रंप यांनी 2016 मध्ये आपले प्रचार अधिकारी आणि रशियाच्या मध्यस्थांशी झालेल्या चर्चेची चुकीची माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती