धुळे केमिकल कंपनी स्फोट: ‘अशा कंपन्यांना योग्य शासन केलं पाहिजे’ म्हणणारा दुर्गेशच स्फोटात गेला - ग्राउंड रिपोर्ट

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (10:22 IST)
प्रवीण ठाकरे
"कंपनीत सारंकाही आलबेल नाही. तिथे कधी स्फोट होऊ शकतो. सरकारनं अशा कंपन्यांना योग्य शासन केलं पाहिजे, असं दुर्गेश वारंवार सांगायचा," विश्वास मराठे आपले अश्रू आवरत सांगत होते.
 
शनिवारी धुळ्याच्या रुमिथ केरसिंथ या कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांनी आपला मुलगा दुर्गेश मराठे गमावला होता. महिनाभरापूर्वीच त्यानं या केमिकल कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. आणि ज्याची त्याला भीती होती, त्यानेच त्याचा घात केला.
 
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी शिवारात शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास रुमिथ केमसिंथ या रसायन बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आणि 13 जण मृत्युमुखी पडले. जवळपास 58 जण जखमी झालेत.
 
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातीलअग्निशामक दल, राज्य आपत्ती नियंत्रण दलाचे पथक, पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाने आग नियंत्रणात आणली. पण स्फोटाची धग घटनास्थळी स्फोटाच्या 24 तासांनंतरही जाणवत होती. हा भाग पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तिथला ढिगारा काढणं अशक्य होतं.
 
कंपनीच्या रसायनांच्या संपर्कात आल्याने पीडितांबरोबरच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चार जवानांनाही त्रास झाला. त्यांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तत्पूर्वी SDRFनं कंपनीतून 10 मृतदेह बाहेर काढले होते. तर एकूण मृतांचा आकडा 13 वर पोहोचला होता. मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे.
 
वाघाडी गावातील नितीन कोळीही या कंपनीत मेंटेनन्स विभागात काम करायचा. स्फोट झाला तेव्हा त्याचे भाऊ विनोद आणि चुलत भाऊ हिंमत कोळी बस स्टॉपवर उभे होते.
 
"स्फोटाचा आवाज ऐकताच विनोद लगेच कंपनीकडे धावला," हिंमत कोळी सांगतात. "तो अतिशय मनमिळाऊ होता... चार बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वांत लहान. यावर्षी त्याचं लग्न करण्याची तयारी घरात सुरू होती."
 
"नितीनने राजस्थान आणि गुजरातमध्येही काम केलं होतं. त्याच्या घरच्यांवरही या स्फोटाने मोठा आघात केलाय," हिंमत सांगतात.
स्फोटाचे हादरे दहा किमीपर्यंत
शिरपूर-शहादा रस्त्यावर बाळदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतात हा कारखाना आहे. आजूबाजूला फक्त शेती आहे.
 
सकाळी साडेनऊला शिफ्ट संपल्यानंतर कामगार बाहेर पडत होते तर सकाळच्या शिफ्टचे कामगार आत प्रवेश करत होते. त्याचवेळी कारखान्यातील रासायनिक संयंत्रातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच व्यवस्थापनाने कामगारांना तातडीने बाहेर जाण्याचा इशारा दिला. कामगार बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच संयंत्राचा स्फोट झाला. हा स्फोट CCTV कॅमेरात कैद झाला.
 
स्फोटाचा हादरा परिसरातील दहा किमीपर्यंत बसला. आवारातील कामगारांची घरं तर उद्ध्वस्त झाली होतीच, शिवाय स्टीलच्या हंड्याचेही तुकडे पडले होते. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येऊ शकते.
 
या कंपनीत काम करणारे कामगार आजूबाजूच्या परिसरातील तर काही मध्य प्रदेशातील होते. कारखान्यालगतच्या कंपाउंडच्या भिंतीलगत झोपडी आणि पत्राच्या शेडमध्ये हे कामगार राहायचे. याच कामगारांची दोन मुलं या अपघातात दगावली.
 
आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा काही लोक त्यांच्या झोपड्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये काहीतरी शोधाशोध करत होते. विचारल्यावर त्यांच्यापैकीच एक रघु पवार सांगू लागले, "आमच्या काकू आणि तिची लेक गेली. काका गंभीर जखमी आहेत तर त्यांचं एक लहान मूल दवाखान्यात आहे. ते काय करायचे काही समजत नाही. इथे कागदपत्रे लागतील म्हणून हुडकतोय."
'गावाच्या इतिहासातील काळा दिवस'
स्फोटाचा आवाज आल्यानंतर आसपास असलेल्या लोकांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. सरकारी यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच जखमींना दुचाकीवरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू झालं होतं.
 
स्फोट झाला तेव्हा वाघाडी गावचे सरपंच इथूनच जात होते. त्यांनीही त्वरित मदतकार्य सुरू केले. "ही आजवरची सर्वात दुर्दैवी आणि भयानक घटना आहे. हा गावाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. तिथे मदत करताना गावातली कुणी ओळखीची व्यक्ती तर नाहीये ना, अशी एक धडधड माझ्या मनात होती," ते भावुक झाले होते.
 
स्फोटांबाबत माहिती कळताच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. उपजिल्हा रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय यासह शहरातील सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकांद्वारे जखमींना दवाखाण्यात दाखल करण्यात आलं.
 
शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा इथील पालिका आणि धुळे महापालिकेचे अग्निशमन दल आग विझवण्याची प्रयत्न करत होते. पण रासायनिक आग विझवण्यासाठी फोम असलेली अग्निशामक बंब मात्र येथे नव्हते, नाशिकमधून रासायनिक आग विझवणारे एकूण तीन बंब मागवण्यात आले, ते दुपारी पोहोचले.
 
याबरोबरच राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काँक्रीटच्या ढिगाऱ्यातून काही लोकांना सुखरूप बाहेर काढलं.
 
SDRFचे पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी सांगितलं ठिकठिकाणी सळई, कंपनीच्या लोखंडी ढाच्याचे मोठे अँगल आणि सिमेंटच्या खांबांमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. "पण आम्ही लोकांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र ढिगाऱ्याखाली अजून काही मृतदेह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रासायनिक टाकी थंड झाल्यावरच ते पाहणं शक्य होईल," ते म्हणाले.
 
ऑगस्ट 2018 मध्ये रुमिथ केमसिंथ ही कंपनी मुंबईच्या चार भागीदारांकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यापूर्वी मबिजासनी पेट्रोकेमिकल्स या नावाने ही कंपनी सुरू होती. औषधांसाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे उत्पादन तिथे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
कंपनी मालकांवर भारतीय दंडसंहिता 304, 336 आणि 337 या कलमांअन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. कंपनी मालकांनी सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख आणि सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती