कोरोना लस: 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

मंगळवार, 23 मार्च 2021 (16:12 IST)
1 एप्रिलपासून भारतातील 45 वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
सर्व 45 वर्षांवरील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी नोंदणी करावी असं जावडेकर म्हणाले.
लशीच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढवलं आहे. पूर्वी 28 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश होते आता 4 ते 6 आठवड्यांमध्ये लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.
16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतेय. पण आता 45 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली.
या लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.
 
कोविन (Co-WIN) अॅप काय आहे?
कोव्हिड 19च्या लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेला मदत करणं हे या अॅपचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं भारत सरकारने म्हटलंय. यासोबतच लस घेण्यासाठी या अॅपच्या किंवा को-विन वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करता येते.
कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. हे मोबाईल अॅप लसीकरणाविषयीची आकडेवारीही नोंदवेल. यासोबतच सगळ्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक डेटाबेसही हे अॅप तयार करेल
पण या Co-WIN अॅपच्या नावावरून काहीसा गोंधळ आहे. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहीण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19. पण भारतीय माध्यमांनी याला कोव्हिड व्हॅक्सन इंटेलिजन्स नेटवर्क असंही म्हटलंय.
 
लस घेण्यासाठी स्लॉट कसा बुक करायचा?
तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP - वन टाईम पासवर्ड येईल. तो नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदवलेल्या लोकांची नावं दिसायला लागतील.
या नावांसमोर असणाऱ्या कॅलेंडरच्या खुणेवर क्लिक करून तुम्ही अपॉईंटमेंट घ्यायची आहे.
या खुणेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल.
यामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांचा समावेश असेल.
जिथे पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असं लिहीलेलं असेल.
यातल्या एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.
या अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती