कोरोना तेलंगाणा: 9 रुग्णालयांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतर महिलेचा मृत्यू

सोमवार, 29 जून 2020 (13:22 IST)
दीप्ती बथिनी
"ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत होती. सगळं संपल्याचं तिला माहीत होतं. आमची मदत करायला कुणीच पुढे आलं नाही, ती गेली. आम्ही 9 हॉस्पिटलच्या चकरा मारल्या पण काहीच मदत मिळाली नाही."
 
ही गोष्ट आहे 17 जूनची. पी. श्रीकांत यांना अजूनही तो दिवस ठळकपणे आठवतो. याच दिवशी त्यांची पत्नी पी. रोहिता जग सोडून निघून गेली होती.
 
रोहिता आणि श्रीकांत हैदराबादमध्ये आपला 17 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलगी यांच्यासोबत राहत होते. रोहिता यांना तीन दिवसांपासून ताप होता, असं त्यांनी सांगितलं.
 
ते सांगतात, "आम्ही जवळच्या रुग्णालयात गेलो. हा फक्त व्हायरल ताप असल्याचं सांगत त्यांनी औषधं दिली. तिचा ताप कमी झाला पण खोकला कायम होता. मग पुन्हा खोकल्याचं टॉनिक देण्यात आलं. पण 16 तारखेच्या मध्यरात्री तिला अस्वस्थ वाटू लागलं."
 
पण ही एका दुःखद रात्रीची सुरुवात होती. या वाइटाची चाहूलसुद्धा श्रीकांत यांना नव्हती. त्या रात्री रोहिताला घेऊन श्रीकांत कारने सनशाईन हॉस्पिटलला गेले.
 
खुर्चीवर बसवून दिला ऑक्सिजन सपोर्ट
श्रीकांत यांनी सांगितलं, "आम्ही रुग्णालयाच्या दरवाजावर पोहोचलो, तेव्हा तिथं उभ्या शिपायाने आम्हाला निघून जाण्यास सांगितलं. मी इमर्जन्सीची स्थिती असल्याचं सांगून आत गेलो. यानंतर माझ्या पत्नीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी बेड नसल्याचं सांगितलं. मी त्यांना प्राथमिक उपचार तरी करण्याची विनंती केली. त्यांनी काही मिनिटं ऑक्सिजन सपोर्ट देण्याचं मान्य केलं. पण लवकरात लवकर इथून निघून जाण्याची अटही घातली."
 
रोहिता यांना एका घाणेरड्या खोलीत खुर्चीवर बसवून ऑक्सिजन दिल्याचं ते सांगतात. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे श्रीकांत पत्नीला घेऊन अपोलो हॉस्पिटलला गेले. रोहिता यांना कोव्हिड-19ची लक्षणं आहेत आणि त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. "रोहिताची तब्येत बिघडत चालली आहे. त्यांना इथून घेऊन जा."
श्रीकांत पुढे म्हणाले, "मला काहीच समजत नव्हतं. मी एका मोठ्या खासगी रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डजवळ उभा होतो. कोणत्याही टेस्टशिवाय माझ्या पत्नीला कोव्हि़ड असल्याचं ते कसं सांगू शकतात? खूप विनंती केल्यानंतर त्यांनी ऑक्सिजन देऊ असं सांगितलं. पण यानंतर आम्हाला जावं लागेल, असंही ते म्हणाले."
 
यानंतर श्रीकांत पत्नीला घेऊन दुसऱ्या एका विरिंची हॉस्पिटलला गेले. तिथंही सुरक्षारक्षकाने त्यांना आत जाण्याची परवानगी दिली नाही. तिथंही स्टाफ किंवा बेड नसल्याचंच उत्तर श्रीकांत यांना मिळालं.
 
यानंतर रोहिता यांना केअर हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथंसुद्धा प्राथमिक उपचारानंतर त्यांना जाण्यास सांगितलं. यानंतर श्रीकांत यांच्या कारमधलं पेट्रोलही संपलं.
 
त्यांनी 108 नंबरवर अँब्युलन्सशी संपर्क साधला. कॉल सेंटरच्या व्यक्तीने खासगी हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकत नसल्याचं सांगितलं. अखेर अँब्युलन्स बोलावून रोहिता सरकारी हॉस्पिटलला नेल्याचं श्रीकांत सांगतात.
 
सरकारी रुग्णालयाकडे रवाना
खासगी रुग्णालय कोव्हिड-19च्या भीतीमुळे रोहिता यांना दाखल करून घेणं टाळत होते. तेव्हा सरकारी रुग्णालयात पत्नीवर उपचार होऊ शकतात, असं श्रीकांत यांना वाटलं. ते रोहिता यांना किंग कोटी रुग्णालयाला घेऊन गेले. इथंच कोव्हिड-19 ची चाचणी केली जाते.
सरकारी रुग्णालयाबाहेरसुद्धा सुरक्षारक्षकाने त्यांना अडवलं. श्रीकांत म्हणतात, "तोपर्यंत माझा संयम सुटला होता. माझ्या पत्नीची तब्येत बिघडत चालली होती. मी रागाने त्या सुरक्षारक्षकाला फटकावलं आणि थेट रुग्णालयात शिरलो. तिथंसुद्धा बेड नसल्याचंच मला ऐकायला मिळालं. मला एका मोठ्या रुग्णालयात घेऊन जायला त्यांनी सांगितलं. मला वादात वेळ घालवायचा नव्हता. मी तातडीने पत्नीला घेऊन उस्मानिया हॉस्पिटलला घेऊन गेलो.
 
ते सांगतात, "रुग्णालयात आम्ही कशासाठी आलो आहोत, हेसुद्धा कुणी आम्हाला विचारत नव्हतं. मी माझ्या पत्नीला आत नेण्यासाठी स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर शोधत होतो. मला एक व्हीलचेअर मिळाली, पण तिला चाकच नव्हतं. ती घेतच होतो तोपर्यंत एका महिला कर्मचाऱ्याने मला त्यासाठी पैसे भरण्यास सांगितलं. पण माझ्याकडे पैसे नव्हते. कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मी माझं पाकीट एका नातेवाईकाला दिलं होतं. तो काही वेळात परत येणारच होता. पण महिला कर्मचाऱ्याने पैसे भरण्यासाठी माझ्या मागे तगादा लावला.
 
"मी तिला माझा फोन दिला आणि व्हीलचेअरवर पत्नीला बसवून मी वॉर्डात गेलो. मी स्वतः तिला ऑक्सिजन दिलं. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर आले. त्यांनी चाचणीबाबत यादी दिली.
 
"चाचणी करण्यासाठी गेलो तर तिथं रक्ताचे डाग लागलेले चादर पडलेले होते. जेवण जमिनीवर पसरलेलं होतं. पण चाचणीचं काम कशा प्रकारे लवकरात लवकर करता येईल, याकडे माझं लक्ष होतं."
 
चाचणीनंतर ड्यूटीवरच्या डॉक्टरांकडे गेलो. पण तोपर्यंत माझ्या पत्नीचा पल्स रेट कमी व्हायला सुरुवात झाली होती. डॉक्टर त्यांच्या वरिष्ठांकडे बोलण्यासाठी गेले. परतल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. पत्नीला दुसऱ्या रुग्णालयाला घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
स्ट्रेचरवर एकटं सोडलं
हे ऐकल्यानंतर श्रीकांत आणखी निराश झाले. पत्नीवर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे होते, पण उपचार करण्यासाठी कुणीच तयार होत नव्हतं.
 
यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे मदतीसाठी फोन करायला सुरुवात केली. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या एका नातेवाईकांनी त्यांना एका रुग्णालयाचा पत्ता दिला. तिथं बेड आणि व्हेंटिलेटरसुद्धा उपलब्ध होते, असं ते म्हणाले.
 
श्रीकांत पुढे सांगतात, "मी माझ्या पत्नीला घेऊन त्या रुग्णालयाला गेलो. तिथं तिला काही औषधं देऊन उपचार सुरू केले. पण काही वेळानंतर तिच्यात कोव्हिडची लक्षणं असल्यामुळे उपचार करू शकत नाही, असंच त्यांनीही सांगितलं. बराच वेळ वाद घातल्यानंतर त्यांनी सीटी स्कॅन करण्यास सांगितलं. त्यासाठी तिला एका खोलीत नेलं पण अर्धा तास झाला तरी ते बाहेर आले नाहीत."
 
"इतका वेळ का लागत आहे, हे पाहण्यासाठी मी खोलीत गेलो. पण ते दृश्य विदारक होतं. माझ्या पत्नीला स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. तिच्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. तिला रामभरोसे तिथं सोडलं होतं. भीतीमुळे तिच्याजवळ कुणी जातही नव्हतं. माझी पत्नी रडत होती. हे सगळं चुकीचं चाललं असल्याचं तिला कळून चुकलं होतं. तोपर्यंत रुग्णालयांच्या चकरा मारत आमचे 6 तास वाया गेले होते."
 
श्रीकांत तोपर्यंत निराश झाले होते. त्यांना प्रचंड राग आला होते. ते पुढे सांगतात, "मी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत होतो. त्यानंतर पुन्हा एका खासगी अँब्युलन्सला कॉल केला. कोव्हिडसाठी बनवलेल्या गांधी हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयात गेलो. पुन्हा दरवाजावर थांबवण्यात आलं. कोव्हिड-19चा अहवाल मागितला. गार्डला न जुमानता मी आत गेलो."
 
तिथंसुद्धा श्रीकांत यांना पुन्हा किंग कोटी हॉस्पिटलाच जाऊन कोव्हिडची टेस्ट करण्यास सांगितलं. तोपर्यंत रोहिता यांची वेळ निघून गेली होती. त्यांची पत्नी आपली आयुष्याची लढाई जवळपास हरली होती.
 
अशा प्रकारे कठीण परीक्षेतून गेलेले श्रीकांत एकटे व्यक्ती नाहीत. या काळात त्यांच्याप्रमाणे अनेकांनी आपल्या जोडीदाराचा जीव जाताना पाहिला आहे.बेड का मिळत नाहीत?
तेलंगणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर इथं कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण वाढत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
 
रुग्ण वाढत असल्यामुळेच बेड उपलब्ध होत नसल्याचं हैदराबादच्या एका मोठ्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात काम करणारे एक ज्येष्ठ कर्मचारी सांगतात.
 
त्यांच्या मते, 90 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. पाच टक्के रुग्णांना रुग्णालयातील साधारण उपचारांची तर उर्वरित 5 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागातील उपचारांची गरज पडते.
 
पण या उपचारासाठी आयसोलेशनची आवश्यकता आहे. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा असते. रुग्णालय हा उपचार करण्यासाठी तयार आहेत. पण या परिस्थितीत काम करण्यासाठी विशेषज्ञ लोकांची कमतरता आहे.
 
तेलंगणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. भास्कर राव सांगतात, खासगी रुग्णालयात क्षमतेनुसार बेड उपलब्ध आहेत. पण कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अलाक्षणिक रुग्णसुद्धा खासगी रुग्णालयांमध्ये जात आहेत. खरं तर त्यांनी होम क्वारंटाईन होण्याची गरज आहे. त्यामुळेच अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीत.
 
शिवाय, सरकारी रुग्णालयात अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळेसुद्धा वैद्यकीय सेवेवर परिणाम होत आहे.
 
सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात किंग कोटी रुग्णालयात 14 व्हेंटीलेटरसोबतचे बेड आणि ऑक्सिजन सपोर्टसोबत 300 बेड उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.
 
तर गांधी हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटरसह 80 तर ऑक्सिजन सपोर्टसह 1,200 बेड उपलब्ध असल्याचं सांगितलं.
 
श्रीकांत यांनी ज्या रुग्णालयांबाबत सांगितलं, त्यांच्याशी बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण हा लेख लिहेपर्यंत त्यांच्यापैकी कुणीच प्रतिक्रिया दिली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती