IVF क्लिनिकच्या गोंधळामुळे 'चुकीच्या' मुलांना जन्म दिल्याचा अमेरिकन जोडप्याचा दावा

गुरूवार, 11 जुलै 2019 (11:22 IST)
IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने पालक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आशियाई दांपत्याने कॅलिफोर्नियातील फर्टिलिटी क्लिनिकवर एक मोठा गोंधळ केल्याचा आरोप केलाय. या गोंधळामुळे आपण 'चुकीच्या' मुलांना जन्म दिल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे.
 
या दोघांनी न्यूयॉर्कमध्ये खटला दाखल केला असल्याचं अमेरिकन मीडियाने म्हटलंय. या दांपत्याने जुळ्यांना जन्म दिला, पण ही मुलं आशियाई वंशाची नसल्याने त्यांना धक्का बसला.
 
या मुलांचा या जोडप्याशी संबंध नसल्याचं DNA चाचणीमध्ये सिद्ध झाल्याचं या जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. या जोडप्याने आता या मुलांवरील ताबा स्वखुशीने सोडला आहे.
 
कॅलिफोर्नियातल्या फर्टिलिटी क्लिनिकने अद्याप याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
या जोडप्याचा याचिकेमध्ये उल्लेख AP आणि YZ असा करण्यात आला असून ते पालक होण्यासाठी अनेक वर्षं प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांनी IVF म्हणजेच इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन उपचारासाठी तब्बल एख लाख अमेरिकन डॉलर्सचा खर्च केला. उपचार, प्रयोगशाळेची फी, प्रवास आणि इतर गोष्टी मिळून त्यांना इतका खर्च आला.
 
IVF तंत्रज्ञानामध्ये महिलेच्या शरीराबाहेर बीजाचे फलन करण्यात येते आणि मग गर्भाशयामध्ये बीजाचे रोपण करण्यात आल्यानंतर या गर्भाचा विकास होतो.
 
गेल्या आठवड्यामध्ये न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रीक्टमध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये CHA फर्टिलिटी क्लिनिकवर आणि त्याचे मालक असणाऱ्या दोघांवर आरोप करण्यात आले आहेत. वैद्यकीय गैरव्यवहार आणि हेतुपरस्सर भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
 
याचिकेनुसार या जोडप्याला 30 मार्च रोजी जुळे मुलगे झाले. पण "आपल्या जनुकांपासून गर्भधारणा झाल्याचं सांगण्यात आलेली बाळं, तशी दिसत नसल्याने" या जोडप्याला धक्काच बसला.
 
काहीतरी वेगळं होत असल्याची शंका या जोडप्याला तेव्हाच आली होती, जेव्हा त्यांना मुलगे होणार असल्याचं स्कॅननंतर सांगण्यात आलं होतं. कारण सुरुवातीला डॉक्टर्सनी त्यांना आपण उपचारांदरम्यान 'मेल एम्ब्रियो' म्हणजे पुरुष भ्रूण वापरला नसल्याचं सांगितलं होतं.
 
पण हे स्कॅनिंग चुकीचं असल्याचं डॉक्टर्सनी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी मुलं झाली.
 
शिवाय या याचिकेत असंही सांगण्यात आलंय की या मुलांचा या जोडप्याशी तर संबंध नाहीच, पण या बाळांचं एकमेकांशीही नातं नाही.
 
CHA फर्टिलिटीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की ते, "प्रत्येकाला सर्वोच्च प्रतीची सेवा कर्तव्यभावनेने पुरवतात." बीबीसीने या कंपनीशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला आहे.
 
या दांपत्याच्या वकिलांनी बीबीसीला सांगितलं की त्यांच्या अशीलांना 'CHA फर्टिलिटीच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदार वर्तनामुळे' मनस्ताप भोगावा लागत आहे.
 
"या जोडप्याला झालेल्या त्रासाबद्दल मोबदला मिळवणं आणि अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही, याची खात्री करण्यासाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती