पश्चिम बंगाल लोकसभा निकाल: ममता बॅनर्जी यांच्या गडाला भाजपने असं पाडलं खिंडार

शुक्रवार, 24 मे 2019 (11:54 IST)
आधीच भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकमेकांवर झाडलेल्या फैरी, त्यानंतर बंगालमध्ये मतदानादरम्यान फेरफारीचे आरोप आणि प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार, यांमुळे साऱ्या देशाचं लक्ष बंगालवर लागून होतंच.
 
त्यातच आज आलेल्या निकालांतून स्पष्ट होतंय की अमित शहांच्या सेनेने ममता दीदींच्या गडाला खिंडार पाडले आहे. सध्या आलेल्या आकड्यांवरून असं दिसतंय की इथे जवळपास 40 टक्के मतांसह घेऊन भाजप 42 पैकी 18 जागांवर आघाडीवर आहे. तृणमूलही 23 जागांवर आघाडीवर आहेच, पण त्यांचं झालेलं नुकसान लक्षवेधी आहे.
 
पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुका सर्वाधिक चर्चेत होत्या.
 
मागच्या निवडणुकीत आसनसोलच्या जागेवरून जिंकणारे जिंकलेले भाजप खासदार बाबुल सुप्रियो यंदाही जिंकणार, असं दिसतं आहे. 2014 मध्ये जिंकलेल्या दार्जिलिंगमध्येही भाजप यंदाही आघाडीवर आहेत.
 
पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती, असं जेष्ठ पत्रकार प्रभाकर मणी तिवारी म्हणतात. "पश्चिम बंगालमध्ये जेव्हा एखादा नवा पक्ष प्रस्थापित आणि सत्तेत असलेल्या पक्षाविरोधात आव्हान निर्माण करतो तेव्हा हिंसाचार होतोच."
 
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये बराच हिंसाचार झाला. अमित शाहांच्या रोड शो मध्ये झालेल्या हिंसाचारावरून बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले.
 
"सन 2009 पासूनच पश्चिम बंगालमध्ये भाजपला होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपला आशा होती की त्यांना मिळणारा लोकाश्रय जागांमध्ये परावर्तित होईल. म्हणूनच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी या भागात पुरेपूर जोर लावला होता," ते सांगतात
 
या सगळ्याची फलश्रुती म्हणून भाजपचं पश्चिम बंगालमधलं हे यश आहे का? की आणखी काही मुद्दे याला कारणीभूत होते?
 
पश्चिम बंगालमधल्या स्थानिक पत्रकार शिखा मुखर्जी सांगतात, "भाजपने जे यश इथे मिळवलं आहे, त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेली अॅन्टीइन्कम्बसीची लाट. ममता सरकारला वैतागलेल्या लोकांना भाजपच्या रूपात चांगला पर्याय मिळाला.
 
"भाजपने बंगालच्या जनतेला एक वेगळी दिशा दाखवली. आपण आत्ता जे आहोत, त्यापेक्षा वेगळे असू शकतो, वेगळे जगू शकतो, असा विश्वास दाखवला. त्याला पश्चिम बंगालच्या लोकांनी स्वीकारलं," असं त्या सांगतात.
 
राष्ट्रीय राजकारणात सहभागी होण्याची इच्छा
पश्चिम बंगालच्या लोकांना देशाच्या मुख्यधारेतल्या राजकारणातून तुटल्यासारखं वाटत होतं. "काँग्रेस 1967 साली हरल्यानंतर पश्चिम बंगाल राष्ट्रीय राजकारणातून बाहेर फेकलं गेलं. त्यानंतर आता पहिल्यांदा पश्चिम बंगालला मुख्य प्रवाहात नेणाऱ्या पक्षाचा आधार मिळाला आहे. आपण राष्ट्रीय पटलावर आलो तर आपल्याला एक राज्य म्हणून आर्थिकरीत्या फायदा होईल, असंही बंगालच्या लोकांना वाटतं, म्हणून त्यांनी भाजपला कौल दिला," असं शिखा सांगतात.
 
धर्माच्या राजकारणाचं वाढतं प्राबल्य
तिसरं आणि महत्त्वाचं कारण शिखा अधोरेखित करतात ते म्हणजे धर्माच्या आधारावर झालेलं विभाजन. "धर्म कधी नव्हे तो एवढा महत्त्वाचा झालेला आहे. पश्चिम बंगालमधल्या हिंदूंना तिथे मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लीम लोकसंख्येमुळे असुरक्षित वाटतं. हिंदुत्ववादी पक्ष अशी असलेली भाजपची प्रतिमा त्यांना आश्वासक वाटते. म्हणून भाजपला यश मिळालेलं आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती