बेन स्टोक्स : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारा इंग्लंडचा क्रिकेटमधला हिरो

सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (10:25 IST)
पराग फाटक
अगदी आतापर्यंत बॅड बॉय म्हणून कुप्रसिद्ध झालेला बेन स्टोक्स आता इंग्लंडचा हक्काचा हिरो झाला आहे.
 
अॅशेस मालिकेतील लीड्स कसोटीत अविश्सनीय खेळीसह इंग्लंडला जिंकून दिल्यानंतर सोशल मीडियावर बेन स्टोक्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
इंग्लंडचा माजी ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानने दिलेली प्रतिक्रिया दिलखुलास म्हणावी लागेल. 'मला बहीण नाही, मात्र असती तर मी तिचं बेन स्टोक्सशी लग्न लावून दिलं असतं', असं स्वानने म्हटलं आहे.
 
ठिकाण-कोलकाताचं इडन गार्डन्स. निमित्त ट्वेन्टी-20 वर्ल्डकपची फायनल. तारीख 3 एप्रिल 2016.
 
वेस्ट इंडिजने थरारक पद्धतीने फायनल जिंकली परंतु रडवेल्या चेहऱ्याचा, घामाने निथळलेला, उष्णतेने लालबुंद झालेला बेन स्टोक्सचा चेहरा चाहत्यांच्या मनात कोरला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये जे घडलं त्यावर विश्वास बसणं कठीण होतं.
इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 155 रन्स केल्या. ट्वेन्टी-20 मध्ये हे टार्गेट अवघड नव्हतं. परंतु वेस्ट इंडिजच्या सातत्याने विकेट्स जात होत्या. मार्लन सॅम्युअल्स एकट्याने खिंड लढवत होता. शेवटी त्याच्या साथीला कार्लोस ब्रेथवेट आला.
 
शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 19 असं समीकरण झालं. कठीण होतं. इंग्लंडचा कॅप्टन आयोन मॉर्गनने बेन स्टोक्सकडे बॉल सोपवला. धावा रोखणं आणि विकेट्स काढण्यात माहीर स्टोक्स मॅच जिंकून देईल असा विश्वास इंग्लंड संघाला होता.
 
मात्र जे घडलं ते इंग्लंडसाठी विपरीत. 4 चेंडूत 4 सिक्सेस मारून ब्रेथवेटने अविश्वसनीय पद्धतीने वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकून दिला. ब्रेथवेट आणि वेस्ट इंडिजचं सेलिब्रेशन जोशात सुरू असताना स्टोक्स डोक्याला हात लावून, गुडघ्यात डोकं घातलेला स्टोक्स सांत्वन करण्याच्या पलीकडे गेला होता. खेळात पराभव होतात परंतु ब्रेथवेटच्या षटकारांनी स्टोक्सच्या आत्मविश्वासावर वर्मी घाम बसला होता.
 
ठिकाण- इंग्लंडमधल्या ब्रिस्टल इथला नाईटक्लब. निमित्त- वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाचं सेलिब्रेशन. तारीख-24 सप्टेंबर 2017 ची रात्र
 
हा दिवस बेन स्टोक्स कधीच विसरू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे जिंकल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी स्टोक्स सहकारी अलेक्स हेल्ससह नाईटक्लबमध्ये पोहोचला.
 
सेलिब्रेशन राहिलं बाजूला, त्या उत्तररात्री जे घडलं त्याने स्टोक्सच्या आणि पर्यायाने इंग्लंड क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेला. नाईटक्लबच्या बाहेर स्टोक्स आणि अन्य काही जणांमध्ये बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर मारामारीत झालं. दोनजणांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी स्टोक्सला अटक करण्यात आली.
 
याप्रकरणात स्टोक्सच्या हातालाही जखम झाली. त्या घटनेपासून पुढचं वर्ष स्टोक्सच्या आयुष्यातलं काळोखं पर्व ठरलं. या घटनेचे काही व्हीडिओ रिलिज झाले.
 
केटी पीअर्स यांच्या दिव्यांग मुलाची नक्कल त्यानं केल्याचं उघड झालं. स्टोक्सने ट्वीटरच्या माध्यमातून यासाठी माफी मागितली. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. वर्षभर खटला चालला, स्टोक्सचं क्रिकेट मागं पडलं.
 
नाईटक्लबबाहेर दोन गे मुलांची दोन अन्य मुलं चेष्टा करत होते. गे मुलांना उद्देशून त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला. असं करणाऱ्या त्या मुलांच्या हातात बाटल्या होत्या. स्टोक्सने त्यांना असं वागू नका सांगितलं. मात्र त्यांचा उच्छाद कमी झाला नाही.
 
हेल्सने स्टोक्सला यात पडू नकोस असं सांगितलं परंतु प्रकरण वाढत गेलं. ती मुलं आक्रमक झाल्यानंतर स्टोक्सने स्वसंरक्षणासाठी त्यांना चोप दिला. स्टोक्सच्या माराने त्यातला एकजण बेशुद्ध झाला.
 
कोर्टात स्टोक्स दोषी नसल्याचं सिद्ध झालं. मात्र याप्रकरणाने स्टोक्स आणि इंग्लंड क्रिकेटची नाचक्की झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला 30,000 पौंडाचा दंड केला.
स्टोक्सला जामीन मिळाला मात्र त्या सीरिजमधून त्याला वगळण्यात आलं. इंग्लंडसाठी अशेस मालिका म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा. परंतु अशा वर्तनामुळे स्टोक्सची अशेससाठी निवड करण्यात आली नाही. स्टोक्सकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्याने वैयक्तिक स्पॉन्सरशिपही गमावली.
 
हे दोन प्रसंग. एक माणूस म्हणून स्टोक्सच्या प्रतिमेला बदनाम करणारा तर दुसरा खेळाडू म्हणून कौशल्यावर शंका निर्माण करणारा.
 
मारहाणीच्या प्रसंगाने बेन स्टोक्स बॅड बॉय झाला होता. आधीची काही प्रकरणंही त्याला कारणीभूत ठरली. 2011 मध्ये डरहॅममध्ये दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांनी त्याला अटक केली होती.
 
2013 मध्ये दारु पिण्याबाबतच्या संघाने ठरवलेल्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आलं होतं. वर्षभरात वेस्ट इंडिजमध्ये खेळत असताना पहिल्या बॉलवर रनआऊट झाल्याने स्टोक्सने रागाने ड्रेसिंग रुममधला लॉकर तोडला होता. यात तोही जखमी झाला होता.
 
वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सशी स्टोक्सची वादावादी झाली होती. 2016 मध्ये वेगात गाडी चालवल्याबद्दल चारवेळा त्याला ताकीद देण्यात आली.
 
बांगलादेशच्या सब्बीर रहमानसह झालेल्या वादावादीमुळे त्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असताना मैदानात भारतीय खेळाडू आणि स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या होत्या.
 
हे सगळं असलं तरी क्रिकेटच्या मैदानावर स्टोक्सचं वर्णन जिगरबाज असंच करावं लागेल. भात्यात सगळ्या प्रकारचे फटके असणारा आणि योग्यवेळी ते मारता येणं हे स्टोक्सच्या बॅटिंगचं गुणवैशिष्ट्य.
डावखुऱ्या बॅट्समनच्या शैलीत नजाकत असते. स्टोक्सच्या बॅटिंगमध्ये बेडर रांगडेपणा आहे. भागीदाऱ्या रचणं, तळाच्या बॅट्समनबरोबर खेळणं, एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा मेळ घालणं यात स्टोक्स माहीर आहे.
 
स्टोक्स बॉलिंग करतो. त्याच्याकडे सुसाट वेग नाही, फार स्विंगही करत नाही. परंतु बॅट्समनला फसवण्यात स्टोक्स वाकबगार आहे. भागीदारी तोडण्यात तो निष्णात आहे. बॅक ऑफ द हॅड, रिपर, स्लोअर वन यांच्याबरोबरीने बॅट्समनच्या छाताडावर जाणारा बाऊन्सर सोडणारा स्टोक्स धोकादायक आहे.
 
स्टोक्सची फिल्डिंग इंग्लंडसाठी अनेकदा किमयागार ठरली आहे. बॅटिंग-बॉलिंगच्या इतकाच फिल्डिंगचा सराव करणारा स्टोक्स दुर्मीळ खेळाडू आहे.
 
अफलातून कॅचेस, भन्नाट रनआऊट्स अशी स्टोक्सची खासियत आहे. ऑलराऊंडर कसा असावा याची व्याख्या जॅक कॅलिस, अड्रयू फ्लिनटॉफ यांनी करून दिली. असा खेळाडू जो संघात निव्वळ बॅट्समन म्हणून किंवा विशेषज्ञ बॉलर म्हणून खेळू शकतो तो ऑलराऊंडर.
 
स्टोक्स या व्याख्येचा लाईव्ह डेमो आहे. कॉमेंटेटर स्टोक्सला इम्पॅक्ट प्लेयर म्हणतात. संघात असला की बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मॅचवर तो छाप उमटवतो.
 
स्टोक्स चांगलं खेळला की इंग्लंड जिंकतं असं आकडेवारी सांगते. टेस्ट-वनडे-ट्वेन्टी-20 सगळ्या फॉरमॅटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करणारा स्टोक्स जगातल्या कोणत्याही संघात फक्त बॉलर किंवा केवळ बॅट्समन म्हणून स्थान मिळवू शकतो.
 
ठिकाण-लॉर्ड्स, क्रिकेटची पंढरी. निमित्त-वर्ल्ड कप फायनल
जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडवर पहिलंवहिलं जेतेपद मिळवण्याचं दडपण होतं. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 241 रन्स केल्या.
 
इंग्लंडने दबावाखाली सातत्याने विकेट्स गमावल्या. बेन स्टोक्सने खिंड लढवली. तो मॅच जिंकून देणार असं चित्र होतं मात्र मॅच टाय झाली. स्टोक्सने 84 रन्स केल्या. पराभव दिसत असताना, सहकारी आऊट होत असताना स्टोक्सने किल्ला लढवत इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या.
 
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 15पैकी 8 रन्स स्टोक्सनेच काढल्या होत्या. नाट्यमय अशा फायनलचा स्टोक्स मॅन ऑफ द मॅच ठरला होता.
 
ठिकाण-हेडिंग्ले, लीड्स. निमित्त- अॅशेस मालिकेतला निर्णायक सामना.
 
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यावर इंग्लंड संघाचं कौतुक झालं. मात्र काही तासातच या कौतुकाचं रुपांतर प्रचंड टीकेत झालं कारण इंग्लंडचा डाव 67 धावांतच गडगडला.
 
ऑस्ट्रेलियाने अवघड खेळपट्टीवर 246 रन्स करत इंग्लंडसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं. स्विंग, वेग आणि बॅट्समनची क्षणोक्षणी कसोटी पाहणाऱ्या पिचवर इंग्लंडची 2 बाद 15 अशी अवस्था झाली.
 
टेस्टमध्ये बराच वेळ बाकी होता. जो रूट आणि जो डेन्ली यांनी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. स्टोक्स खेळायला उतरला तेव्हा परिस्थिती ऑस्ट्रेलियाच्या बाजूने होती. स्टोक्स नेहमीच्या नैसर्गिक आक्रमकतेने खेळत राहिला.
 
जोश हेझलवूडच्या बाऊन्सरने त्याच्या हेल्मेटखाली असलेल्या नेक प्रोटेक्टरचे तुकडे झाले. पण तो बधला नाही. ऑस्ट्रेलियाने नववी विकेट मिळवली तेव्हा इंग्लंडच्या 286 रन्स झालेल्या. अजूनही 73 रन्सची आवश्यकता होती. स्टोक्स 61वर खेळत होता.
 
जॅक लिच मैदानात उतरला आणि स्टोक्सच्या अक्षरक्ष: अंगात संचारलं. ही मॅच जिंकून द्यायचीच असा निग्रह केलेल्या स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला.
 
चौकार-षटकारांची लयलूट करणाऱ्या स्टोक्सने योग्यवेळी एकेरी-दुहेरी धावा घेत इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला. अशेसवर जवळपास नाव कोरलेल्या ऑस्ट्रेलियाचा विजयाचा घास स्टोक्सने एकहाती हिरावून घेतला. इंग्लंडने मॅच जिंकली तेव्हा स्टोक्सच्या नावावर 11 फोर आणि 8 सिक्ससह नाबाद 135 धावा होत्या.
 
स्टोक्स-लिच जोडीने शेवटच्या विकेटसाठी 62 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. यामध्ये स्टोक्सचं योगदान होतं 74 रन्सचं. यावरून स्टोक्सक्रमणाची कल्पना येऊ शकेल.
 
परिस्थिती प्रतिकूल असताना सर्वोत्तम खेळ करण्याची हातोटी यामुळे स्टोक्स बाकीच्यांच्या तुलनेत वेगळा ठरतो. अफलातून कौशल्य, बाहूत असलेली ताकद, विलक्षण आत्मविश्वास आणि मी करून दाखवतो ही इच्छाशक्ती यामुळे स्टोक्सला खेळताना पाहणं नैराश्यवादी मनालाही ऊर्जा देऊ शकतं.
 
निळसर डोळे, टोकदार नाक, पिंगट केस आणि दाढी, पिळदार शरीरयष्टी आणि अंगभर चितारलेले टॅटू-स्टोक्सला पाहताच तो सेलिब्रेटी असल्याची जाणीव होते.
 
स्टोक्स मूळचा न्यूझीलंडचा. तो 12 वर्षांचा असताना त्याचे कुटुंबीय इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. त्याचे बाबा, गेरार्ड स्टोक्स रग्बी प्लेयर. कॉकरमाऊथ नावाच्या ठिकाणीच तो लहानाचा मोठा झाला. रग्बी प्रशिक्षणातून बाजूला झाल्यानंतर बेनचे वडील ख्राईस्टचर्चला परतले.
 
मात्र बेन स्टोक्स इंग्लंडमध्येच राहिला. वर्ल्ड कप फायनलमध्ये स्टोक्सने इंग्लंडला विजय मिळवून दिला तेव्हा न्यूझीलंडमध्ये त्याच्या बाबांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.
 
फायनलमध्ये स्टोक्सच्या बॅटला अनाहूतपणे लागून बॉल फोर गेला आणि मॅचचं चित्र पालटलं. कोणतंही चूक नसलेल्या त्या घटनेसाठी स्टोक्सने माफी मागितली. न्यूझीलंडच्या सर्वोच्च सन्मानासाठी स्टोक्सची निवड करण्यात आली. स्टोक्सने विनम्रपणे पुरस्कार नाकारताना, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पुरस्काराचा खरा हकदार असल्याचं सांगितलं.
 
IPL मध्येही चर्चेत
आयपीएल स्पर्धेत कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या खेळाडूंमध्ये स्टोक्स अग्रणी आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांसाठी खेळताना स्टोक्सने वारंवार आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
बेन स्टोक्सचं विराट कोहली कनेक्शन
विराट कोहली आक्रमकपणासाठी ओळखला जातो. अशावेळी त्याच्या तोंडून 'बे...' अशी शिवी बाहेर पडते. ती शिवी आणि बेन स्टोक्स या शब्दाचा उच्चार सारखाच वाटतो. त्यामुळे विराट कोहली जेव्हा ती विशिष्ट शिवी देतो तेव्हा स्टोक्सचं नाव घेतो अशा मीम्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.
 
इंग्लंडची ऑलराऊंड परंपरा
इंग्लंडला इयन बोथम, फ्लिनटॉफ यांच्या रुपात दर्जेदार ऑलराऊंडर लाभले आहेत. स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतर त्याच्याकडे नेक्स्ट बिग थिंग म्हणून पाहिलं जात होतं. सातत्याने चुकीच्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारा स्टोक्स आपली प्रतिभा वाया घालवणार अशी चिन्हं होती. मात्र मैदानाबाहेरच्या गोष्टी बाजूला सारत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून स्टोक्सने बोथम आणि फ्लिनटॉफ यांच्या परंपरेत स्थान पटकावलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती