Donald Trump Impeachment : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर पण...

पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर झाला आहे.
 
ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवावा की नाही यावर मतदान झालं त्यात डेमोक्रेटिक पक्षाच्या 229 लोकप्रतिनिधींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं तर डोनाल्ड ट्रंप यांच्या 197 प्रतिनिधींनी त्यांच्यावर महाभियोग चालू नये असा कौल दिला. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सचं बहुमत आहे.
 
आता हा प्रस्ताव सिनेटमध्ये जाणार असून तिथं ट्रंप यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तेथे मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.
 
अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे हटवण्यात आलेलं नाही. आतापर्यंत फक्त दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाला सामोरं जावं लागलं आहे.
 
ट्रंप यांची चौकशी का झाली?
 
डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, 2020 साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला, असा आरोप एका व्हिसलब्लोअरनं केला आहे.
 
हे असं करणं बेकायदेशीर आहे?
जर डोनाल्ड ट्रंप यांनी अशाप्रकारचा फोन केल्याचं सिद्ध झालं तर ट्रंप यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण अमेरिकेत निवडणूक जिंकण्यासाठी परदेशी संस्थांकडे मदत मागणं बेकायदेशीर आहे.
 
ट्रंप-युक्रेन प्रकरण नेमकं काय आहे?
याच वर्षी 25 जुलैला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसलब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता.
 
हा व्हिसलब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल घेण्याजोगी' आणि विश्वासार्ह मानली गेली. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची प्रत संसदेत मांडण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट खासदारांनी केली होती.
 
यानंतर अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी राष्ट्रपती ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली.
 
युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर जेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून बोलताना जो बायडेन आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची तपासणी सुरू करण्यासाठी ट्रंप यांनी जेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.
 
जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत ते पक्षाचे उमेदवार असू शकतात. म्हणजेच ते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे.
 
बायडेन यांचा मुलगा युक्रेनमधल्या एका गॅस कंपनीत काम करत होता. याप्रकरणी अद्याप बायडेन यांच्या विरोधातला कोणताही पुरावा समोर आलेला नाही.
 
युक्रेनचे नवे राष्ट्रपती जेलेन्स्की सत्तेत आल्यानंतर ट्रंप यांनी युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा डेमोक्रॅट नेत्यांचा आरोप आहे.
 
2020 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रंप यांनी स्वतःच्या फायद्यासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचं डेमोक्रॅट नेत्यांचं म्हणणं आहे.
 
महाभियोगाची प्रक्रिया
महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला राष्ट्रद्रोह, लाच आणि इतर गंभीर अपराधांबद्दल महाभियोगाला सामोरं जावं लागतं.
 
महाभियोगाची ही प्रक्रिया अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजपासून सुरू होते आणि ती मंजूर करण्यासाठी साधारण बहुमत गरजेचं असतं.
 
सिनेटमध्ये यावर एक सुनावणी होते पण इथे महाभियोगाला मंजुरी देण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. 1868 मध्ये जॉन्सन यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्यात आला होता. जॉन्सन यांचं प्रकरण बिल क्लिंटन यांच्या अगदी विरुद्ध होतं. केवळ एका मताने जॉन्सन यांच्यावरील महाभियोग केवळ एका मताने टळला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती