'एकेकाळी मी फिनेल, डिटर्जंट विकायचो', गुलशन ग्रोव्हर

- मधू पाल
हिंदी सिनेमांमध्ये 'बॅडमॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते गुलशन ग्रोव्हर आता त्यांच्यासोबतच्या इतर कलाकारांच्या पंक्तीत येऊन बसले आहेत. कारण नसिरुद्दीन शहा, शत्रुघ्न सिन्हा आणि ऋषी कपूर यांच्यासारखं आता त्यांचंही आयुष्य एक 'खुली किताब' झालंय.
 
गुलशन ग्रोव्हर यांच्या आयुष्यावरील 'बॅडमॅन' हे पुस्तक भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते दिल्लीत झालं. गुलशन ग्रोव्हर यांचे जवळचे मित्र असणारे अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीही यावेळी हजर होते.
 
पत्रकार रोशमिला भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या या चरित्रामध्ये गुलशन ग्रोव्हर यांच्या आयुष्यातील वेगवेळ्या प्रसंगांसोबतच त्यांच्या गरिबीच्या काळातील संघर्षाचाही उल्लेख आहे.
 
गरिबीला घाबरलो नाही!
बीबीसीशी बोलताना अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितलं, "मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माझं बालपण गरिबीत गेलं. मला आठवतंय, माझी शाळा दुपारची असायची. पण शाळेचा युनिफॉर्म दप्तरात भरून मी सकाळीच घरातून निघायचो. माझ्या घरापासून दूरवर असणाऱ्या मोठमोठ्या घरांजवळ मी रोज सकाळी भांडी धुण्याची पावडर विकायचो. कधी डिटर्जंट पावडर तर कधी फिनेलच्या गोळ्या तर कधी फडकी. हे सगळं विकून मिळालेल्या पैशांतून माझा शाळेचा खर्च सुटायचा. त्या मोठ्या घरांमध्ये राहणारेही माझ्याकडून सामान विकत घ्यायचे. कारण मला पुढे शिकता यावं असं त्या सगळ्यांना वाटत होतं."
 
"मी गरिबीला कधी घाबरलो नाही. आणि याचं कारण होते माझे वडील. त्यांनी नेहमीच आम्हाला खरेपणा आणि मेहनतीच्या मार्गाने चालत रहायला शिकवलं." असंही ते सांगतात.
 
स्ट्रगल आणि उपासमार
गुलशन म्हणतात, "मी माझ्या या पुस्तकांत अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. माझ्या आई-वडिलांच्या आठवणी सांगताना मला सगळ्यात जास्त यातना झाल्या. त्या दिवसांमध्ये आमच्याकडे जेवणासाठीही पैसे नसायचे. दिवस-दिवस उपाशी रहावं लागे. हे सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही की मी कॉलेजला जाईपर्यंत आमची अशीच स्थिती होती. आणि जेव्हा मी अॅक्टिंगसाठी मुंबईला आलो तेव्हाही अनेकदा मला उपाशी रहावं लागलं. आजचा दिवस कुठे काढायचा, याचा रोज मी विचार करत असे. पण मी आशा सोडल्या नाहीत. जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि त्याचा परिणाम तुम्हा सर्वांच्या समोर आहे."
रॉकी सिनेमातून ब्रेक मिळाला!
दिल्लीतल्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन यांनी 1980 मध्ये आलेल्या 'हम पाँच' सिनेमातून पदार्पण केल्याचं म्हटलं जातं. पण असं नाही.
 
गुलशन सांगतात, "माझा पहिला सिनेमा 'हम पाँच'नसून 'रॉकी' होता. त्याचं शूटिंग पहिलं सुरू झालं. मला अभिनयाचा नाद होता म्हणून मी थिएटर करत राहिलो आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी मी प्रेम नाथ, अमरीश पुरी, अमजद खान या सगळ्यांकडे पाहून खूप काही शिकलो.
 
"त्या सगळ्यांचं निरीक्षण करत मी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वेगळं काम करण्याचा आणि वेगळी स्टाईल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहाता पहाता मी एक चांगला खलनायक झालो. आज इतक्या वर्षांनंतर लोकं खलनायकांना विसरून गेली असतानाही मला लोकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे पुन्हा संधी मिळत आहे. सूर्यवंशी, सडक 2 सारख्या मोठ्या सिनेमांमध्ये मी खलनायकाची भूमिका करतोय."
 
सहकलाकारांनी गिरवला कित्ता
हॉलिवूडमध्य सर्वात आधी नशीब आजमावणारे आपण पहिले भारतीय अभिनेत असल्याचा दावाही गुलशन ग्रोव्हर करतात. त्यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा 'द सेकंड जंगल बुक : मोगली अँड बल्लू' 1997 साली रिलीज झाला होता.
 
परदेशी सिनेमांमध्ये काम करण्याचा त्यांचा हा सिलसिला आजही सुरू आहे. त्यांनी जर्मन, ऑस्ट्रेलियन, पोलिश, कॅनेडियन, मलेशियन, ब्रिटीश आणि नेपाळी सिनेमांसह विविध भारतीय भाषांतल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
 
ते म्हणतात, "परदेशी सिनेमांमध्ये काम करण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या मध्ये एक पायवाट बनवली आणि मला आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की प्रियांका चोप्रा, अनुपम खेर आणि इरफान खानसारख्या माझ्या सोबत्यांनी याच पाऊलवाटेवरून जात ती वाट आणखी रूढ केली."
 
जगाला माहित नव्हता भारतीय सिनेमा
गुलशन ग्रोव्हर पुढे सांगतात, "परदेशातल्या सिनेमांमध्ये काम करणं माझ्यासाठी कठीण होतं. कारण जेव्हा मी परदेशी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा इंटरनेट नव्हतं. आमचे सिनेमे कुणी पाहिले नव्हते. तिथले दिग्दर्शक, कलाकार, निर्मात्यांना गुलशन ग्रोव्हर नावाचा कुणी अभिनेता आहे, हे माहित नव्हतं. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतंच. त्या लोकांना अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानही माहित नव्हते आणि मोठमोठे फिल्म मेकर्सही त्यांना माहित नव्हते."
 
"फेस्टिव्हलमध्ये दाखवले गेलेले सिनेमेच परदेशात माहित होते. कधीतरी कुठल्यातरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना सत्यजीत रे यांचे सिनेमे किंवा इतर निवडक सिनेमे पाहता यायचे. त्या लोकांना भारतीय सिनेमा माहित नाही, याचं खूप वाईट वाटायचं. म्हणूनच मी अभिनेता आहे, हे त्यांना सांगणं मला खूप कठीण जायचं. मी अनेक ऑडिशन्स दिली. जेव्हा कधी सिलेक्ट झालो, तेव्हा त्यांना सांगायचो की शूटिंग सुरू होण्याआधी मी येईन आणि शूटिंग संपलं की लगेच परत जाईन."
 
"हे ऐकून ते म्हणायचे की तुला असं करता येणार नाही, कारण तुला कधीही बोलावलं जाऊ शकतं. मी त्यांना सांगायचो की इथे मी एक किंवा दोनच सिनेमे करत आहे. पण भारतामध्ये मला एकाचवेळी 20 सिनेमाचं शूटिंग करायचं आहे आणि दिग्दर्शक-निर्मात्यांचे पैसे अडकलेले आहेत. मी त्यांना धोका देऊ शकत नाही. जर तुम्हाला हे पटत असेल तरच मला काम द्या."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती