डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे 'बाबासाहेब' कसे बनले?

शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (09:13 IST)
तुषार कुलकर्णी
आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर, डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या. पुढे ते नेते झाले, मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टरसाहेब असं म्हणत.
 
त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून त्यांना 'बोधिसत्व' देखील म्हटलं गेलं, त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आला. इतक्या सर्व पदव्या आणि बहुमान आहेत पण देशातील कोट्यवधी लोकांसाठी ते 'बाबासाहेब' आहेत.
 
ही पदवी नाही की कोणते पद नाही पण कोट्यवधी जनतेनी प्रेमाने दिलेली हाक म्हणजेच बाबासाहेब हे कुणी नाकारू शकणार नाही.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांचं कोणतं रूप सर्वांत आधी डोळ्यासमोर येतं. भारतातील वंचित समाजातील कोट्यवधी लोकांच्या मुक्तीची मार्ग दाखवणारा महामानव हे त्यांचं एक रूप आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार हे एक त्यांचे रूप आहे.
 
अर्थशास्त्रज्ञ, मानवंशशास्त्रज्ञ, कायदेपंडित, प्राध्यापक, प्राचार्य, मूकनायक, जनता-बहिष्कृत भारत सारख्या नियतकालिकांचे संपादक, ही देखील त्यांची रूपं आहेत.
 
अशा विविध रूपांत त्यांचे आपल्याला दर्शन झाले आहे. पण त्यांचे अजून एक रूप आहे आणि ते सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते रूप म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेलं त्यांचं 'बाबासाहेब' हे रूप.
 
देशातील कोट्यवधी जनता त्यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना 'बाबासाहेब' याच नावाने ओळखते. बाबासाहेब हयात असताना त्यांना त्यांचे सहकारी 'डॉक्टरसाहेब' किंवा 'बॅरिस्टर साहेब' असं म्हणत. पण सर्वांसाठी ते साहेब किंवा बाबासाहेबच होते. त्यांच्यासमोर जाणारी व्यक्ती त्यांच्या करिष्म्यामुळे भारावून जात असे पण बाबासाहेब सर्वांना समान वागणूक देत असत.
 
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्त्व त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते. त्यांचा हा साधेपणा, त्यांची जिव्हाळ्याची वागणूक पाहून ते पितृतुल्य आहेत याची जाणीव जनतेच्या मनात रूजू लागली आणि ते कोट्यवधी लोकांचे बाबासाहेब बनले.
 
त्यांच्याबाबतच्या आठवणी अनेक लोकांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत. त्यांच्या मनात असलेली करुणा आणि जिव्हाळा लोकांनी कसा टिपला, लोकांना प्रेरित करून ते 'बाबासाहेब' कसे बनले या गोष्टीचा शोध या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
आपल्या पक्षकारांसाठी स्वयंपाक बनवला
लंडनमधील ग्रेज इन या कॉलेजमधून वकिलीचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले.
 
त्यांनी वकिलीच करायचे ठरवले. याचे कारण म्हणजे या व्यवसायातून मिळणारी सवड आणि स्वातंत्र्य. आणि वेळेचा उपयोग अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी देण्याचे त्यांनी ठरवले.
 
त्यांनी वकिली सुरू केली पण त्यांचे बहुतांश पक्षकार हे वंचित आणि गरीबच असत. त्यामुळे त्यांची कामे बाबासाहेब फुकटच करत असत.
 
धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात याविषयी लिहिले आहे की, "आंबेडकरांची वकील म्हणून प्रसिद्धी होताच गोरगरीब आपल्या गाऱ्हाण्यांची दाद लावून घेण्यासाठी बाबासाहेबांचे कार्यालय शोधीत येत. त्या पददलितांचे दुःख आणि दैन्य पाहून त्यांचे हृदय तीळतीळ तुटे. बाबासाहेब त्या गरिबांचे काम बहुधा फुकट करीत. त्याकरिता त्रास सहन करीत.
 
"त्या काळी आंबेडकर हे गरिबांचे आशास्थान, चाहत्यांचे आनंद निधान आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले होते. घरातील मंडळी (रमाई) या बाहेरगावी गेली असता एके दिवशी बाहेरगावाहून दोन गृहस्थ त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले. न्यायालयात कामधंद्यासाठी जाण्यापूर्वी त्या दोन्ही गृहस्थांबरोबर त्यांनी न्याहारी केली.
 
"आंबेडकर स्वयंपाकलेत कलेत निपुण. संध्याकाळी घरी लौकर परतून त्यांनी त्या गृहस्थांकरिता आपल्या हाताने स्वयंपाक करून ठेविला. रात्री जेवतेवेळी ती गोष्ट त्या पाहुण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. जो मनुष्य मितभाषी आहे, ज्याचा स्वभाव गूढ आहे, ज्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि परिणामकारक आहे अशा थोर पुरुषाने गरिबांसाठी एवढे शारीरिक कष्ट घ्यावे ह्याविषयी त्या गरिबांना धन्यता वाटली.
 
सायमन कमिशनची साक्ष, तर दुसरीकडे पक्षकारांच्या जीवन मरणाचा प्रश्न
आपल्या अशिलांवर अतिप्रसंग ओढावू नये, त्यांची अडचण होऊ नये याची देखील डॉ. आंबेडकर काळजी घेत.
 
ब्रिटिश सरकारसमोर दलित समाजाची स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी 1928 साली निवड झाली होती.
 
या कमिशनसमोर बाबासाहेब दलितांची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाय योजनांचे वर्णन करणार होते. या बैठकीसाठी एक नियोजित वेळ असे आणि त्यात त्यांना संपूर्ण दलित समाजाच्या वतीने बाजू मांडावी लागत असे.
 
त्यांची यावेळी वकिली देखील सुरू होती. एका महत्त्वाच्या खटल्यासाठी त्यांना ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर आपल्या अशिलांची बाजू मांडायची होती. आणि त्याच वेळी सायमन कमिशनसमोर देखील साक्ष होती. जर बाबासाहेब त्या खटल्यासाठी उपस्थित राहिले नसते तर कदाचित त्या अशिलांपैकी काहींवर फासावर जाण्याची वेळ आली असती. आणि आपल्या अशिलांच्या ऐनवेळी आपण कामाला आलो नाहीत ही सल देखील त्यांना कायमची राहिली असती.
 
जर सायमन कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी हजर झालो नाहीत तर देशातील कोट्यवधी लोकांचे दुःख जगासमोर मांडण्याची संधी निघून जाईल या पेचप्रसंगात बाबासाहेब होते. त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की अशिलांच्या बचावाचे भाषण फिर्यादी पक्षाच्या आधी होऊ द्यावे.
 
फिर्यादी पक्षाचे भाषण आधी व्हावे असा एक संकेत असतो पण कामाची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी परवानगी मागितली आणि त्यांना ती देण्यात आले. पक्षकारांची बाजू मांडून मग बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनसमोर गेले.
 
धनंजय कीर बाबासाहेबांच्या चरित्रात म्हणतात की, "बचावासाठी मांडलेल्या मुद्यांची अचूकता नि आपल्या वकिली कौशल्यावरील त्यांचा विश्वास एवढा प्रगाढ होता की, त्या खटल्यातील बहुतेक आरोपी निर्दोषी म्हणून सुटले ह्यात नवल ते कोणते?"
 
दवाखान्यात उपचार मिळत नाही म्हणून एका भगिनीने बाबासाहेबांचे घर गाठले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकनेते होते. त्यांच्या घराचे दार सर्वसामान्यासाठी सदैव उघडे असायचे.
 
आपल्या संग्रहातील असंख्य ग्रथांना हक्काचे घर मिळावे म्हणून बाबासाहेबांनी मुंबईमध्ये दादर येथे 'राजगृह' हे घर बांधले.
 
वास्तू आणि स्थापत्यशास्त्राविषयी पुस्तकं वाचून त्यांनी आपल्या निवडीप्रमाणे हे घर बांधले. त्यात एका मजल्यावर कुटुंबातील सदस्य असत आणि एका मजल्यावर बाबासाहेब ग्रंथ सानिध्यात असत.
 
त्यांचा स्वभाव असा होता की जर आपला कुणी सहकारी थंडीत आहे आणि त्याच्याकडे पुरेसे कपडे नाहीत तर ते स्वतःच्या अंगावरील पांघरूण काढून देत असत.
 
याबाबत धनंजय कीर यांच्या पुस्तकात उल्लेख आहे त्यात असं म्हटलं आहे की 'भर थंडीच्या रात्री आपले सहकारी बळवंतराव वऱ्हाळे यांना आपले पांघरूण देऊन आपण कडाक्याच्या थंडीत तसेच झोपी गेले.'
 
ही तर झाली रोजच्या सहवासातील लोकांची गोष्ट. पण बाबासाहेबांचे घर म्हणजेच राजगृह हे अनेक दीनदुबळ्यांचे हक्काचे घर होते. तिथे लोक रात्री-अपरात्री येऊन बाबासाहेबांकडे गाऱ्हाणी मांडत.
 
आपल्या गाऱ्हाण्यांची बाबासाहेब दखल घेतील हा विश्वास त्यांना होता त्यामुळेच ते त्यांच्याकडे जाऊ शकत असत.
 
एकदा एका महिलेनी राजगृहाचे दार रात्री दोन वाजता ठोठावले. तिने बाबासाहेबांना दुःखित हृदयाने सांगितले, माझा नवरा अत्यवस्थ आहे. त्याला गेल्या बारा तासांत प्रयत्न करूनसुद्धा रुग्णालयात प्रवेश मिळू शकला नाही.'
 
बाबासाहेबांनी तिला नि तिच्या नवऱ्याला गाडीत घालून तडक रुग्णालयाकडे नेले आणि तिच्या नवऱ्यास प्रवेश मिळवून दिला. पहाट झाली तेथून ते तडक आपले स्नेही आचार्य मो. वा. दोंदे यांच्या घरी गेले.
 
आपल्या घरी बागकाम करणाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले
बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या दिल्लीतील निवासस्थानी एक वृद्ध गृहस्थ बागकाम करत असत. त्यांची प्रकृती बरी नाही असे समजल्यावर ते आणि त्यांचे सहायक नानकचंद रट्टू हे त्यांच्या घरी पोहचले.
 
ते वृद्ध अंथरुणाला खिळून बसलेले होते. त्यांचं अंग तापेनं फणफणत होतं. शेजारी त्यांची पत्नी बसली होती. आपण गेल्यावर हिचं कसं होणार ही चिंता त्यांना सतावत होती.
 
जेव्हा बाबासाहेब आपल्या घरी आले हे त्यांनी पाहिलं तेव्हा ते गहिवरून गेले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि साक्षात माझ्या भगवानानेच मला भेट दिली आहे असे ते म्हणाले. ते चिंताग्रस्त होते. त्यांचे बाबासाहेबांनी सांत्वन केले आणि भेट घेऊन ते घरी परतले.
 
विरोधकाला उदार मनाने माफ केलं
बाबासाहेबांचे मन किती विशाल होते याची कल्पना या पुढील गोष्टीवरून आपल्याला येऊ शकते.
 
देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायणराव काजरोळकर यांनी बाबासाहेबांचा 15,000 मतांनी पराभव केला होता.
 
विरोधक असून देखील नंतरच्या काळात बाबासाहेबांनी त्यांच्याविषयी मनात द्वेष ठेवला नाही उलट त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनच केले असं डॉ. सविता (माई) कुबेर यांनी आपल्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या पुस्तकात लिहिले आहे.
 
त्या लिहितात, "एकेदिवशी नारायणराव काजरोळकर साहेबांना भेटायला सिद्धार्थ कॉलेजमध्ये (मुंबई) आले. कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपण म्हणा किंवा संकोच वाटत असावा असे मला वाटते. कारण ते संकोचानेच समोर आले. त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलीकीने जवळ बोलवले. काजरोळकर आले आणि त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं."
 
"साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठविले आणि शेजारी बसवून घेतले व निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले. आत्मीयतेने चौकशी केली. इतकेच नव्हे तर सांगितले की दिल्लीला नेहमी भेटत राहा, तसेच कसलेही मार्गदर्शन वा मदत लागली तर संकोच करू नका. माझ्या बंगाल्याचे दार आपल्या लोकांसाठी नेहमी उघडे असते.
 
"त्यानंतर दिल्लीला काजरोळकर आमच्या बंगल्यावर नेहमी येत असत. साहेब त्यांना सर्व प्रकारची सहायता आणि मार्गदर्शन करत असत. काजरोळकरांबद्दल द्वेष किंवा आकस त्यांना चुकूनही कधी त्यांच्या मनात आला नाही. काजरोळकरांकडे प्रतिस्पर्धी म्हणून साहेबांनी कधी पाहिले नाही," अशी आठवण माई आंबेडकरांनी लिहिली आहे.
 
कार्यकर्त्याला दिल्लीतील पर्यटन स्थळे दाखवली
आपल्या कार्यकर्त्यांवर किंवा सहकाऱ्यांवर बाबासाहेबांचे अतोनात प्रेम होते. त्यांना काय हवं नको याकडे ते स्वतः लक्ष तर देतच पण त्या कार्यकर्त्यांसाठी ते वेळ देखील देत असत.
 
याबद्दलचा एक किस्सा डॉ. सविता आंबेडकरांच्या डॉ. आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकात आहे.
 
घनश्याम तळवटकर नावाचे एक कार्यकर्ते काही कामानिमित्त दिल्लीत आले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या आठवणीवर 'परिमल' नावाचे पुस्तक संपादित केले होते.
 
'हे पाहा याने आपल्या आठवणींचे पुस्तक छापले आहे', असं सांगत त्यांनी डॉ. सविता आंबेडकरांना ते पुस्तक दाखवले. यानंतर तळवटकर दोन तीन दिवस बाबासाहेबांकडेच राहिले.
 
तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारले की 'तू दिल्ली बघितलीस काय?' त्यावर ते नाही म्हणाले. यानंतर बाबासाहेब म्हणाले की 'आपण यांना दिल्ली दाखवून आणू.'
 
माई आंबेडकर पुढे लिहितात, "त्याप्रमाणे आम्ही तळवटकरांना कुतूबमिनार, लाल किल्ला, बिर्ला मंदिर, पार्लमेंट हाऊस, राष्ट्रपती भवन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे दाखवली. आम्ही प्रत्येक स्थळाला भेट देऊन येईपर्यंत साहेब आमची वाट पाहात गाडीतच बसून पुस्तक वाचत बसत असत. जेवताना देखील साहेब त्यांची विशेष काळजी घेत आणि आग्रह करून जेवू घालत असत.
 
आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला चहा, जेवण वेळच्या वेळी मिळण्याबाबत ते अत्यंत जागरूक असत. इतकेच काय झोपण्याची व्यवस्था देखील ते प्रत्यक्ष पाहत. आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जिवापाड पुत्रवत प्रेम केले, असं माई आंबेडकरांनी म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या वेळेचा उपयोग अत्यंत जपून करत. ग्रंथवाचन, लिखाण, राजकारण, समाजकारण यातून त्यांना मोकळा वेळ मिळणे अत्यंत दुरापास्त होते. पण त्यातही ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे या गोष्टी करत असत.
 
वसतीगृहाला भेट दिल्यानंतर तर ते मुलांशी गप्पा तर मारत असत पण कधीकधी क्रिकेटही खेळत असत. देशभरातून त्यांना विद्यार्थी पत्र पाठवत असत आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असत.
 
एका मुलाने बाबासाहेबांना विचारले की 'मी माझे शिक्षण पूर्ण करू की नोकरी करू'? जेव्हा पण एखाद्या व्यक्तीसमोर शिक्षण की नोकरी असा पेचप्रसंग उभा राहील त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेलं हे उत्तर आजही मार्गदर्शक ठरू शकतं.
 
बाबासाहेबांना प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलाचं नाव होतं तानाजी बाळाजी खरावतेकर.
 
त्याने बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं, "प्रिय बाबासाहेब, मी कोकणातला असून शिक्षणासाठी मुंबईत आलेलो आहे मी इंटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे आणि आता लष्करामध्ये भरती चालू आहे. लष्करात नोकरी करायला गेलो तर माझे आर्थिक प्रश्न सुटतील लवकर नोकरी लागेल आणि पुन्हा अशी भरती कधी होईल हे माहीत नाही."
 
"मी एका पेचप्रसंगात सापडलेलो आहे की, मी नोकरी करू की शिक्षण घेऊ?" असं पंधरा ओळीचं पत्र त्याने बाबासाहेबांना लिहिलं होतं.
 
आता कोणताच चेहरा नसलेल्या या पत्राला किंवा कुठलीच ओळख नसलेल्या या पत्राची सुद्धा दखल बाबासाहेबांनी घेतल्याचं दिसून येतं आणि त्याच्या पत्राला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात.
 
"मला 21 तारखेला तुमचे पत्र मिळाले आहे ज्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत माझा सल्ला मागितला आहे. माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवावा आणि तुमची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत नोकरीचा विचार करू नये."
 
त्या मुलाने बाबासाहेबांचा हा सल्ला मान्य केला. त्यांनी बीएचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि शिकता-शिकताच बाबासाहेबांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले. इकडून तिकडून निधी गोळा करून त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं.
 
1946 मध्ये हे चरित्र प्रसिद्ध झालं ते देखील कराचीत. त्या पुस्तकाचं नाव आहे 'डॉक्टर आंबेडकर' मग त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या पुढे निघाल्या. परंतु दुर्दैव असे की हा तरुण लेखक वयाच्या 26 व्या वर्षीच हे जग सोडून गेला.
 
र. धों. कर्वेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले
र. धो. कर्वे हे त्याकाळातील अग्रगण्य समाजसुधारक होते. महिलांचे स्वास्थ आणि लैंगिक शिक्षणाबद्दल ते जागृती करण्याचे काम करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे हे भारतात अवघडच होते. या गोष्टींची त्यांना अनेक ठिकाणी किंमत मोजावी लागली.
 
कर्वेंना पुराणमतवादी, लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत असे. आपल्या 'समाजस्वास्थ' या नियतकालिकातून ते अश्लीलतेचा प्रसार करत आहे असा दावा पुराणमतवाद्यांनी केला.
 
इतके करून ते थांबले नाही तर र. धों. कर्वे यांच्याविरोधात त्यांनी एक खटला देखील भरला.
 
त्यांचे वकीलपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले होते. या खटल्यावेळी त्यांनी केलेला युक्तिवाद हा काळाच्या किती पलीकडचा होता याची खात्री पटते. पण त्याचवेळी एका समाजसुधारकाला जेव्हा अनेकांनी एकटं पाडलं आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे आहोत हा विश्वास देखील त्यांनी दिला.
 
'समाजस्वास्थ' या नियतकालिकामध्ये अनेक लोक आपल्या समस्यांविषयी किंवा त्यांना पडलेल्या प्रश्नांविषयी माहिती विचारत असत. त्यावर नियतकालिकात शास्त्रशुद्ध रीतीने उत्तरे दिली जात. याच प्रश्नांवर आक्षेप घेत त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता.
 
1934 साली झालेल्या खटल्यात बाबासाहेबांनी कर्व्यांची बाजू मांडली होती. नियतकालिकातील माहिती अश्लील स्वरूपाची आहे आणि विकृत आहे यावर तुमचे मत काय असा प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारला.
 
त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की 'लैंगिक समस्यांविषयी कुणी जरी लिहिलं तर त्याला अश्लील समजू नये.'
 
पुढे ते म्हणाले की 'जर लोकांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले आणि त्याला जर विकृत समजण्यात येत असेल तर ज्ञानानेच विकृती दूर होऊ शकते. नाही तर ती कशी जाईल? त्यामुळे प्रश्नाला कर्व्यांनी उत्तर देणे हे क्रमप्राप्तच आहे.'
 
हा खटला बाबासाहेब हरले पण एका त्यांनी आपले काळाच्या पलीकडील विचार आणि एका समाजसुधारकाला दिलेली साथ यामुळे तो हा खटला हरुन देखील जिंकले होते असं म्हटलं जातं.
 
डॉ. आंबेडकर हे बाबासाहेब कसे बनले?
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले आणि अस्पृश्य-दीनदुबळ्यांसाठी त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली.
 
डॉ. आंबेडकरांच्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे ते बाबासाहेब बनले, पण ही प्रक्रिया नेमकी कशी झाली याबाबत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सांगतात की "डॉ. आंबेडकर हे बाबासाहेब बनले ही प्रक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आणि जैविक आहे.
 
"कुणी त्यांना ठरवून म्हटलं नाही की हे बाबासाहेब आहेत किंवा त्यांना बाबासाहेब म्हणण्यासाठी कुठलाही सत्कार समारंभ किंवा कार्यक्रम झाला नाही. लोकांना त्यांच्या मोठेपणाची, त्यांच्या आपुलकीची जाणीव झाली आणि त्यातून लोक उत्स्फूर्तपणे त्यांना बाबा किंवा बाबासाहेब म्हणू लागले.
 
"बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही. काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहेत. कित्येक ठिकाणी त्यांना भिमाई म्हटलं आहे, निळाई म्हटलं आहे. बाबासाहेब हे या सर्व लोकांसाठी आई-वडील, मार्गदर्शक, मित्र, सहकारी सर्वकाही आहे. त्याचेच रूप हे बाबा या शब्दांत ते पाहतात," असं उत्तम कांबळे सांगतात.
 
महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी घडलेला एक प्रसंग उत्तम कांबळे सांगतात.
 
ते म्हणतात, की "बाबासाहेबांच्या विरोधकांनी अशी अफवा पसरवली की दलितांच्या राजांचा म्हणजेच डॉ. आंबेडकरांचा मृत्यू झाला. हे ऐकून एक महिला रडू लागली. काही केल्या त्या महिलेचे रडणे थांबेना, शेवटी त्या महिलेला बाबासाहेबांच्या समोरच उभे करण्यात आले. त्यांना पाहून ती महिला रडता-रडता हसू लागली. इतकं प्रेम आणि जिव्हाळा हा बाबासाहेबांविषयी त्यांच्या अनुयायांमध्ये होता.
 
पुढे कांबळे सांगतात की, "या सत्याग्रहावेळी त्यांनी महिलांना उद्देशून भाषण केले आणि ते ऐतिहासिक ठरले. भारतात महात्मा गांधी यांच्यानंतर कुणाच्या आंदोलनात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या.
 
"डॉ. आंबेडकरांनी महिलांना अनेक गोष्टी सांगितल्या. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगितलं. स्वाभिमानाने जगण्यास सांगितलं, अस्वच्छ राहू नका, मृत जनावरांचे मांस खाऊ नका, दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला वाढू नका. याचा परिणाम हा झाला की ते लोकगीतांचे नायक बनले.
 
"या सत्याग्रहानंतर महिलांनी त्यांच्यावर अनेक गाणी रचली आणि त्यात ते त्यांचे बाबा बनले. समाज माणूस घडवतो तसं माणूस सुद्धा समाज घडवतो.बाबासाहेबांच्या बाबतीत ही प्रक्रिया फार लवकर घडली. तत्कालीन समाजाकडे पाहून त्यांनी निर्णय घेतले," उत्तम कांबळे सांगतात.
 
"त्यांच्या डोळ्यासमोर कोट्यवधी अस्पृश्य आणि गोरगरीब लोक होते. त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांचे ऐहिक कल्याण व्हावे यासाठी त्यांनी आपले शिक्षणाचे विषय, व्यवसाय निवडले. दुसऱ्या टप्प्यात ते प्रबोधन करू लागले. ही प्रक्रिया अत्यंत तीव्रगतीने झाली आणि त्यात अगदी तरुण वयातच ते एक आदराचे स्थान बनले आणि बाबासाहेब बनले."
 
"बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही. काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहेत. महान माणसाचं समाजाच्या कणांकणांत वितळून जाणं म्हणजे बाबासाहेब होणं असं मी समजतो."
 
डॉ. आंबेडकरांची सर्वसमावेशकता आणि व्यापकता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यासमोर केवळ दलितांचेच हित होते असे नाही तर सर्वच घटकांच्या उन्नतीचा त्यांनी अत्यंत बारकाईने विचार केला आणि त्यातून ते केवळ दलित समाजाचेच न राहता समाजातील सर्वच घटकांचे आदरस्थान बनले.
 
त्याच आदरापोटी आणि प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब म्हटलं जाऊ लागलं असा विचार निवृत्त न्यायाधीश आणि आंबेडकर चळवळीचे अभ्यासक सुरेश घोरपडे मांडतात.
 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांचा किंवा अस्पृश्यांचा विचार केला नाही. म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल आणून सर्व महिलांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला. त्यांच्याविषयी विविध स्तरातील लोकांमध्ये जी आपुलकीची भावना होती त्याचीच अभिव्यक्ती ही बाबासाहेब या शब्दांत दिसते," असं सुरेश घोरपडे सांगतात.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती